उतारवयातील जोडप्याचं संघर्षमय उत्तरायण विनोदी ढंगाने मांडणारं ‘के दिलं अभी भरा नही…’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यास सज्ज झालंय. विक्रम गोखले आणि रिमा यांनी एकेकाळी गाजवलेले हे नाटक आता नव्या रंगाढंगात नाटयरसिकांना पाहता येणार आहे. ”गोष्ट तशी गमती”ची मधील गमतीदार दांपत्य मंगेश कदम आणि लीना भागवत पुन्हा एकदा आपणास ‘के दिलं अभी भरा नही…’ मधून रसिकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. यापूर्वी रिमा आणि विक्रम गोखले या जोडगोळीला एकत्र आणणाऱ्या या नाटकाला रसिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता. मात्र विक्रम गोखले यांच्या आजारपणामुळे हे नाटक मधेच थांबवण्यात आलं होतं. त्यामुळे हे नाटक पाहण्यासाठी नाट्यरसिकांनाच ‘दिलं अभी भरा नही’ असे म्हणावे लागले. अखेर, मायबाप प्रेक्षकांच्या इच्छापुर्तीसाठी वेद प्रॉडक्शनचे सर्वेसर्वा गोपाळ अलगेरी यांनी हे नाटक पुन्हा नव्याने रंगभूमीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे.
‘के दिलं अभी भरा नही’ या नाटकाचे दिग्दर्शक मंगेश कदम यांनी नाटकात थोडे फार बदल केले असून सध्या या नाटकाची जोरदार तालीम चालू आहे. ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकाच्या प्रयोगाच्यावेळी मंगेश कदम आणि लीना भागवत यांची भेट विक्रम गोखले यांच्याशी झाली. या भेटीदरम्यान त्यांनी शेखर ढवळीकर यांच्या नाटकात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तोपर्यंत या नाटकात मंगेश कदम आणि लीना भागवत या दोघांना नाटकातल्या व्यक्तिरेखेसाठी निश्चित करण्यात आले होते. विक्रम गोखले यांनी या नाटकात काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यावर आपण त्यासाठी नाही म्हणणं योग्य ठरणार नाही असे मंगेश कदम यांना वाटले व त्यांनी या भूमिकेसाठी विक्रम गोखले यांना ऑफर दिली. मात्र विक्रम गोखले यांच्या बायकोच्या व्यक्तिरेखेत लीना या बसत नसल्याकारणाने या भूमिकेसाठी रिमा यांना विचारण्यात आले. यापूर्वीही अनेक नाटक आणि सिनेमांमध्ये या दोघांनीही एकत्र काम केले आहे. या नाटकाचे ७४ प्रयोग झाले. परंतु विक्रम गोखले यांना त्यांच्या डॉक्टरांनी घशाला जास्त ताण देऊ नका असा सल्ला दिला. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यामुळे विक्रम गोखले यांचा नाटकातील प्रवास थांबवावा लागला. प्रेक्षकांनाही या नाटकाचे भरभरून कौतुक केले. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर तसेच विक्रम गोखले यांच्या आशीर्वादाने हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येण्यास सज्ज झाले आहे. “विक्रम काका आणि रिमा यांच्या आशीर्वादाने मंगेश आणि मी या भूमिकांमधून दिसणार आहोत. विक्रमकाका आणि रीमा अशा दोन मोठ्या नावांसह ते नाटक पहिल्यांदा रंगभूमीवर आलं होतं आणि आता आम्ही करतोय, त्यामुळे अर्थातचं थोडं टेन्शन आलंय” असं लीना भागवत यांनी सांगितलं.
उतार वयातील जोडप्याची कथा या नाटकात मांडण्यात आली आहे. माणसे नोकरी लागली की आर्थिक व्यवस्थापनाचा विचार करायला सुरुवात करतात. त्याप्रमाणे ते करायला सुरुवातही करतात मात्र हे सगळ करत असताना भावनिक व्यवस्थापनाचा विचार करायचा विसरून जातात. रिटायरमेंटनंतर पेन्शन आणि इतर आर्थिक बाबींचा विचार केला जातो मात्र भावनिक गोष्टींचा विचार कधी केलाच जात नाही. या नाटकात अरुण आणि वंदना या जोडप्याच्या माध्यमातून उतार वयातील स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेल्या भाविनक गरजांचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मंगेश कदम आणि लीना भागवत यांच्या सोबतच या नाटकात चंद्रशेखर कुलकर्णी, बागेश्री जोशीराव यांच्याही भूमिका आहेत. प्रेक्षकांसाठी मेजवानी असलेलं हे नाटक १६ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.