गणेशावर आधारित ‘मंगलमूर्ती मोरया’ गाण्याचे ऑडियो रेकॉर्डिंग

कोणत्याही कामाची सुरुवात करताना गणपतीला वंदन केले जाते. मग ते काम कोणत्याही क्षेत्रातले असो… गजमुखाच्या आशीर्वादाने करण्यात येणाऱ्या आरंभाचे फलित हे शुभच असते. त्यामुळे, कलेचा दैवत असणाऱ्या गणपतीला अर्पण असे अनेक सुगमसंगीत आपल्याला पाहायला मिळतात. रसिकांच्या पसंतीस उतरणाऱ्या या गणेशस्तुतीपर संगीतात आता आणखीन एका गाण्याची भर पडणार आहे. लवकरच येणाऱ्या गणेश उत्सवाच्या निमीत्ताने ‘मंगलमूर्ती मोरया’ या गाण्याचे अगदी संगीतमय वातावरणात नुकतेच रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ गायक आनंद शिंदे प्रस्तुत विजया आनंद म्युजिक प्रायव्हेट लिमिटेड या प्रॉडक्शन कंपनीचा शुभारंभ देखील या गाण्याच्या रेकॉर्डिंगमार्फत करण्यात आला.

सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विजया आनंद म्युजिक प्रायव्हेट लिमिटेड बॅनरअंतर्गत, सांताक्रुज येथील अजीवासन रेकॉर्डिंग स्टुडियोमध्ये ‘मंगलमूर्ती मोरया’ या पहिल्या गाण्याचा श्रीगणेशा करण्यात आला. मंदार चोळकर लिखित या गाण्याचे दिग्दर्शन स्वप्नील गोडबोले यांनी केले असून, आदर्श शिंदे, अमितराज आणि स्वप्नील बांदोडकर त्रयिंनी यात स्वरसाज चढवला आहे.

गणेशोत्सवात जल्लोष आणि उत्साहात वाजवली जाणारी “गाणी’ हा अविभाज्य घटक असतो. गणेशभक्तांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी हि गाणी महत्वाची कामगिरी बजावतात. ‘मंगलमूर्ती मोरया’ हे गाणेदेखील आगामी गणेशोत्सवात रसिकांचे उत्साह वाढवेल यात शंका नाही.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *